कोरपना प्रतिनिधी:-
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील 6 वर्ग असलेल्या जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये मागील अंदाजे एक ते दोन महिन्यापासून 4 शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. याविषयी संबंधित विभागाला माहिती देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आल्याचे कळते.मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे आरोप होत आहे.शाळा सुरू झाली परंतु अजूनही याठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने अखेर 7 दिवसात रिक्त पदे भरा अन्यथा शाळेलाच कुलूप ठोकू असा इशारा कोरपना तालुका भाजपा तालुकाध्यक्ष तथा कन्हळगाव शाळा समिती अध्यक्ष नारायण हिवरकर यांच्यासह गावऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात कोरपना पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
संबंधित विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मुलांना योग्य शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून शिक्षणाचे तीनतेरा वाजत असल्याचे आरोप काही पालकांनी केले आहे.अशीच परिस्थिती राहिलीच तर मुलांच्या भवितव्याचे काय ? अशी चिंता पालकांना सतावत असून कित्येक पालक टीसी काढून मुलांचा दुसर्या शाळेत प्रवेश घेण्याच्या तयारीत दिसत आहे. असे घडले तर सदर शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकीकडे कोरोना काळात झालेला शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे याठिकाणी शिक्षकांची कमतरता ! या सर्व बाबींचा विचार करून येत्या 7 दिवसात याठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.यासंबंधीचे माहिती माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,शिक्षण अधिकारी जिल्हापरिषद चंद्रपूर यांना सुद्धा निवेदनातू देण्यात आल्याचे कळते.आता याप्रकरणी संबंधित विभाग काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या