गडचांदूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या दुसर्या सार्वत्रिक निवडणूकीत गडचांदूरकरांनी काँग्रेसच्या सौ.सविता टेकाम यांना नगराध्यक्षा म्हणून निवडून दिले.सध्या याठिकाणी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून राकाँचे शरद जोगी हे उपाध्यक्ष म्हणून विराजमान आहे.सत्ता स्थापनेला अडीच वर्षे पूर्ण झाली आहे.शहराचा विकास झपाट्याने होईल अशी अपेक्षा नगरवासीयांना होती.मात्र याठिकाणी काय सुरू आहे हे कळेनासे झाले आहे.शहरातील ओपनस्पेस,छत्रपती शिवाजी महाराज परिसराचे सौंदरीकरण,अग्निशमन गाडीचे शेड,शहरात अनेक ठिकाणचे रस्ते,नाली बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे.वास्तविक पाहता कामे देताना ही कामे दिलेल्या कालावधीत करायची असते.या कालावधीत संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण करणे अनिवार्य आहे.अन्यथा त्या ठेकेदाराकडून नगरपरिषदेने नियमानुसर दंड वसूल करायला पाहिजे.परंतू बऱ्याच कामात हे होत नाही ! एकीकडे ज्या जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले त्यांच्या थकलेल्या गृहकर,पाणीपट्टी करावर 2 टक्के दंड आकारतात आणि जे ठेकेदार दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करत नाही त्यांना मुदतवाढ देतात! हा कोणता न्याय.शेवटी नगरपरिषद सत्ताधारी जनतेच्या हिताचे की ठेकेदाराचे,हे एक न सुटणारे कोडेच बनले आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे काम मुदत संपूनही पुर्ण झाले नाही.त्या ठेकेदाराकडून नियमाप्रमाणे दंड वसूल करण्याऐवजी उलट त्याच्याकडून मुदत वाढीचा अर्ज मागवून सर्वसाधारण सभेत पुन्हा चार महिन्याची मुदत वाढून देण्यात आल्याची माहिती आहे.यामुळे नगरपरिषदेचे मोठे नुकसान झाले असून जनतेवर लादण्यात आलेल्या 2 टक्के दंडाचा निर्णय रद्द करा,ही जनहिताची मागणी पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात मोर्चे, आमरण उपोषण असे आंदोलन करण्याची पाळी येते आणि त्या ठेकेदारावर दंड न लावता सरळ मुदतवाढ देण्यात येते.अखेर नगरपरिषद त्या ठेकेदारावर ऐवढी मेहेरबान का ? असा प्रश्न पडला असताना शेवटी "येतो पब्लिक है,सब जानती है" अशी उपहासात्मक चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.ज्याप्रकारे जनतेच्या 2 टक्के संदर्भात उठाव घेऊन निर्णय रद्द करायला लावले त्याचप्रमाणे त्या ठेकेदारावर दंड लावण्यासाठी लवकरच उठाव घेणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी दिला आहे.आता नगरपरिषद याकडे कसा पाहते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
--------//--------
'छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सौंदर्याकरणाचे काम संबंधित ठेकेदालाला देण्यात आले होते.मात्र काही तांत्रिक अडचण,कोरोनाचे संकट,मुसळधार पाऊस अशा अडचणींमुळे हे काम निर्धारित कालावधीत झाले नाही.पण आता मुदतवाढ दिल्याने लवकरच काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. नगरपरिषद सगळेच ठेकेदारांना मुदतवाढ देत नाही परंतू महाराजांच्या पुतळ्याचे हे काम लवकर व्हावे म्हणून मुदतवाढ देण्यात आली.विरोधी नगरसेवकांना काय म्हणायचं,त्यांना विरोध करायला मुद्दाच हवा.या व्यतिरिक्त काय बोलायचं.
'विक्रम येरणे'
'गटनेता न.प.गडचांदूर'
---------//--------
0 टिप्पण्या