कोरपना:-
कोरपना तालुक्यात गेल्या 20 ते 25 दिवसापासून सतत येणाऱ्या संततधार पावसामुळे शेतातील पिके जवळपास नष्ट झाल्यातच जमा आहे.एकदा नाही तर तीनदा पेरणी करूनही पिके नष्ट झाल्याने बळीराजा अक्षरशः चिंताग्रस्त झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.या विवंचनेत कित्येक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत असल्याच्या बातमी कानावर पडत आहे.याच पार्श्वभूमीवर आदिवासी बहुल भाग असलेल्या कोरपना तालुक्यातील कोठोडा येथील 45 वर्षीय प्रवीण येमुलवार नामक शेतकऱ्यांने 25 जूलै रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली असून सदर शेतकऱ्याने विषप्राशन केल्याची शंका व्यक्त होत आहे.शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा असून यानंतरच खरे चित्र समोर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार मयत शेतकरी हा आई, वडिलाला एकटाच होता त्याच्याकडे 15 एकर वडिलोपार्जित जमीन असून हा एकटाच संपूर्ण शेती सांभाळत होता.असे असताना यंदा सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली.तसेच गेल्या 2 ते 3 वर्षापासून नापिकीचा सामना करत असल्याने याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता.बँक व सावकारी कर्जामुळे हा काही दिवसांपासून अस्वस्थ होता.घटनेच्या दिवशी पत्नी शेतात मजुरीला गेली होती,मुलगा शिक्षणासाठी आदिलाबाद येथे तर आई,वडील बाहेर गावी राहते.घरी कुणीच नसताना दुपारच्या सुमारास याने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली असावी असे अंदाज बांधले जात आहे.
पत्नी मजुरी करून सायंकाळी घरी परतल्यानंतर पतीला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यावर काय झाले काय नाही हेच याला कळेनासे झाले.पतीला रात्री अंदाजे 9 च्या दरम्यान कोरपना ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.सदर घटनेची माहिती कोरपना पोलीस ठाण्यात देण्यात आली.ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सदर घटनेने कोठोडा गाव,परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कोरपना तालुक्यात दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कुटुंब प्रमुखाने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले,म्हातारे आई,वडील असून मायबाप सरकारने याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
---------//--------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या