Subscribe Us

header ads

"कुछ तो लोग कहेंगे,लोगोंका काम है कहेना"

मुख्यसंपादक सै.मूम्ताज़ अली:- 
      महाराष्ट्रात भाजप सत्तेवर असताना एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा धाडसी निर्णय घेण्यात आला.आता याला किती प्रमाणात सफलता मिळाली हे वेगळं सांगायची गरज नाही.भाजपचा कार्यकाळ संपल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना,काँग्रेस, राकाँ अशी महाआघाडी सत्तारूढ झाली आणि सहा वर्ष बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू झाली. आपल्याला आठवत असेल की,दारूबंदी उठवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची जिल्ह्यातील काही दारू दुकानदारांनी एका देवा प्रमाणे चक्क आरतीच ओवाळली होती.सर्वकाही व्यवस्थित सुरू असतानाच अडीच वर्षानंतर अचानकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भुकंप आला.यादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर तीन दिवसापुर्वीच सत्ता पालट झाली.सध्याच्या परिस्थितीत याठिकाणी शिवसेनेतून फुटलेल्या गटाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.काही दिवसानी मंत्रीमंडळाचा विस्तार सुध्दा होईल.
      भाजपच्या काळात झालेली दारूबंदी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरू केली.असे असताना आता पुन्हा भाजप सत्तेवर आल्यानंतर "उभी बाटली, आडवी होणार का ?" याविषयी जनमानसात खलबत सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.ठिकठिकाणी सुरू असलेल्या दारूबंदी बाबतची चर्चा ऐकून एकीकडे परवाना धारक दारू विक्रेते "वेट अँड वॉच" च्या भुमिकेत आहे तर दुसरीकडे अवैध दारूविक्रीसाठी जुनी लॉबी सक्रिय होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.अवैध दारू विक्रेत्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारल्याचे दिसून येत असून त्या काळात दारूबंदी करण्यात आली मात्र सक्षम कायदा नसल्याने गल्लो गल्लीत अवैध दारू विक्री व विक्रेत्यांनी अक्षरशः उच्चांक गाठला होता.कित्येक अल्पवयीन व तरूणांपासून तर वयोवृद्ध महिला व पुरूषांपर्यंत अवैध दारूविक्रीच्या मार्गी लागले होते.मुख्य म्हणजे बंदच्या काळात डुप्लिकेट, विषारी दारूची मोठ्याप्रमाणात विक्री होत होती यामुळे शासनाचा कर बुडत होता.याच पार्श्वभूमीवर दारूबंदीच्या अमलबजावणीसाठी काही कर्तव्यदक्ष पोलीसांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर काहींनी संधीचे सोने केले असे मत व्यक्त होत आहे.असे असताना आता पुन्हा भाजपा सत्तेत आल्याने चंद्रपूर जिल्ह्याची "उभी बाटली,आडवी होणार का ?" याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात असून यासंदर्भात जिल्ह्यात विविध माध्यमातून उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचे चित्र आहे."कहीं खुशी,कहीं गम" अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.सदर विषयी पुढे नेमके काय घडते ! हे आत्ताच सांगणे उचित ठरणार नाही.मात्र चर्चेची तीव्रता लक्षात घेता "कुछ तो लोग कहेंगे,लोगोंका काम है कहेना" असे यानिमित्ताने म्हटले तर वावगे ठरणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या