गडचांदूर प्रतिनिधी:-
कोरपना तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था अंतर्गत उपबाजार समिती गडचांदूर येथे परिसरातील 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी 18 जून रोजी आपापल्या शेतातील चना विक्रीसाठी आणले आणि मोजणी करून दिले.सदर खरेदी नाफेडद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले व त्या दिवशी पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण आल्याने बिलिंग होवू शकली नाही. मालाची पावती सुद्धा दिली.मात्र आता 20,22 दिवसानंतर हे फोन करून सांगतात 'माल परत घेऊन जा,पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदी बंद आहे, आम्ही जबाबदार राहणार नाही' ही बाब लक्षात घेऊन फसवणूक झाल्याची शंका व्यक्त करत शेतकऱ्यांनी भरपावसात थेट गडचांदूर पोलीस ठाणे गाठून सदर बाजार समिती विरोधात तक्रार दाखल केली आहे.
शेतीचा हंगाम सुरू झाला असून विविध कामांसाठी पैशांची गरज शेतकऱ्यांना आहे.आर्थिक चणचण भासत असतानाच विक्री केलेल्या मालाचे पैसे मिळतील अशी आशा या शेतकऱ्यांना होती.मात्र अचानकपणे यांची निराशा झाली.10 जूलै रोजी यांना सांगण्यात आले की,तुम्ही आपला चना घेऊन जा, आम्ही जबाबदार राहणार नाही.यामुळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि यासर्वांनी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार दाखल केली. "आम्ही शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे मोठ्याप्रमाणात चना माल देवून बरेच दिवस झाले, आता आम्हाला शेतीच्या कामासाठी रकमेची नितांत गरज असताना ऐन हंगामाच्या वेळी आम्हाला रक्कम न देता सरळ माल घेऊन जाण्याचे सांगून आमची फसवणूक केली जात आहे.आम्ही सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अक्षरशः हवालदिल झाले आहे.तरी सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी कळकळीची विनंती वजा मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था चंद्रपूर,जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर, तहसीलदार कोरपना,अध्यक्ष कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती,उपबाजार समिती गडचांदूर यांनाही निवेदन पाठविणत आले असून आता मायबाप सरकार यांची व्यथा जाणून न्याय मिळवून देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या