गडचांदूर:-#Farmer_News
अतिवृष्टी,ढगफुटी व महापुरामुळे नुकासग्रस्त बळीराजाला मदतीचे वाटप सुरू आहे.मात्र बँका या रकमेतून कर्ज कपात करीत आहे.सदर बाब अत्यंत गंभीर असून बँकांनी तात्काळ कर्ज कपात बंद करावी आणि शासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कर्ज कपात न करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व सहकार मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. चालू हंगामात झालेल्या अतिवृष्टी,ढगफुटी व त्यातून आलेल्या नदी व नाल्याच्या महापुरामुळे महाराष्ट्र भरातून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा अक्षरशः देशोधडीला लागलेला आहे.आधीच कर्जापायी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र मोठ्याप्रमाणावर सुरू आहे.याची जाणीव सहकारी बँका राष्ट्रीयीकृत बँका यांना पुरेपूर आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले असून रब्बीचे हंगाम करून पेरणी करणे कठीण झाले आहे.शासनाने अपूरी का असेना,अनुदान देण्याचे जाहीर केले व काही भागात वाटपही सुरू झाले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन,मानवाधिकारांचे उल्लंघन करून आधीच आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास बाध्य करणारी आहे.यामुळे त्यांचे जीवन जगणे व शेती करणे अशक्य होणार आहे.
शासनाने व्यापक जनहित लक्षात घेता बँकांकडून अनुदानातून केली जाणारी सक्तीची करकपात तात्काळ थांबवावी आणि या रकमेतून कोणत्याही बँकेने कर्ज कपात करू नये,असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना,लिड बँकांना आणि सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था(DDR)यांना यथाशीघ्र निर्गमित करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते,माजी आमदार अॕड.वामनराव चटप,जिल्हा प्रमुख अरूण नवले,स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष निलकंठराव कोरांगे,युवा आघाडी अध्यक्ष श्रीनिवासन मुसळे,स्वभाप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पौर्णिमा निरंजने,जिल्हा महिला आघाडी प्रमुख ज्योत्सना मोहितकर,प्रा.निलकंठ गौरकार,सुधीर सातपुते,दादा नवलाखे,डॉ.संजय लोहे,पंढरी बोंडे,दिनकर डोहे,प्रा. रामभाऊ पारखी यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

0 टिप्पण्या